गंगाखेड (प्रतिनिधी) जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे शाखा कालवा क्रमांक १२२ ला क्षमतेने पाणी सोडले जात नसल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याच्या वरील भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करीत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना ९०० क्युसेकपेक्षाही कमी विसर्गाने पाणी मिळत आहे. परिणामी शाखा कालवा क्रमांक १२२ सोबतच शाखा कालवा क्रमांक ६८ व ७० वरील शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी मिळत नसल्याची बाब स्थानिक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उद्या मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजारो शेतकऱ्यांसह आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून पाण्याअभावी शेतकऱ्यांची चार पिके आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत. शेतीचे संपूर्ण अर्थकारण हे वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असते. पेरणी, पिकांची वाढ आणि उत्पादनाची गुणवत्ता या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. यासंदर्भात प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे आमदार डॉ.गुट्टे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन शाखा कालवा क्रमांक १२२ ला तात्काळ १ हजार २०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
०००


