परभणी, (प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, परभणी यांच्या वतीने दुचाकी वाहनांसाठी MH22BN ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या नव्या वाहन खरेदीदारांनी विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DD) जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
इच्छुक वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी निर्धारित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी (Dy. RTO Parbhani)’ यांच्या नावे काढून दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहा. रोखपाल, खिडकी क्रमांक ०८ येथे जमा करावा.
नवीन वाहनांची नोंदणी वितरकांच्या स्तरावर होत असल्याने लिलावाची तारीख तसेच नवीन मालिका सुरू करण्याच्या तारखेत बदल करण्याचे अधिकार कार्यालयाने राखून ठेवले आहेत.
दरम्यान, एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र आदेश अथवा सूचना प्रसिद्ध केली जाणार नाही. संबंधित अर्जदारांना त्यांच्या अर्जावर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची अचूक नोंद करावी, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या नवीन मालिकेतील पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक मिळविण्याची संधी लक्षात घेता जास्तीत जास्त इच्छुक वाहनधारकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
***


