वेतन, आरोग्य, सुरक्षा आणि घरांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सूचना
परभणी, (प्रतिनिधी) सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येत असून, त्यांच्या वेतनासह आरोग्य, सुरक्षितता, पदोन्नती आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकार, नवी दिल्लीचे सदस्य रवी कुमार कलोसे यांनी केले.
दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सावली विश्रामगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली परभणी शहर महानगरपालिकेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसह एकूण २४ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते आयोगाचे सदस्य रवी कुमार कलोसे यांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या बैठकीला पोलीस अधीक्षक पंकज कुमावत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांची उपस्थिती होती.
बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. महानगरपालिकेने सहा महिन्यांपर्यंत असलेली वेतनाची थकबाकी कमी करून वेतनाचा विलंब एक महिन्यापर्यंत आणावा, अशा सूचना कलोसे यांनी दिल्या. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे वेतनास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. जीएसटी अनुदान प्राप्त झाल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला प्रथम प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी मलमूत्र हाताने हाताळणे, डोक्यावरून मैला वाहून नेणे आणि जोखमीच्या पद्धतीने स्वच्छता करण्याची प्रथा पूर्णपणे बंद झाली पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करणे, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेने ६० सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश तसेच पदोन्नती दिल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याच्या सूचनाही कलोसे यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेचा प्रभावी प्रचार व प्रसार न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेची माहिती संबंधित कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
**समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय**
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका स्तरावर समन्वय समिती अस्तित्वात नसल्याची बाब बैठकीत निदर्शनास आली. यावर उपमहापौर गणेश देशमुख यांनी सभापती, संबंधित अधिकारी आणि सफाई कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल. यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून समिती कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती दिली.
**३८ सामुदायिक, १२ सार्वजनिक शौचालयांची माहिती**
स्वच्छ भारत अभियान १.० अंतर्गत परभणी शहरात ३८ सामुदायिक शौचालये आणि १२ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. या शौचालयांचे बांधकाम भारतीय मानकांनुसार करण्यात आले असून, मलजल विल्हेवाटीसाठी सेप्टिक टँक व बंदिस्त नाली व्यवस्थेची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व संबंधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेमार्फत जनजागृती आणि प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेप्टिक टँक व मलनिस्सारण वाहिन्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करणे, वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई किट) वापरणे, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या तीन यांत्रिक मैला उपसा मशीनच्या सुरक्षित वापराबाबतही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
**सफाई कर्मचाऱ्यांना घरांसाठी प्रयत्न**
सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. साकला प्लॉट येथे सफाई कर्मचाऱ्यांसाठी जागेवर घरे बांधून देण्याचे आश्वासन उपमहापौर गणेश देशमुख यांनी दिले. महानगरपालिकेच्या जागेवर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरांचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याची माहिती कलोसे यांनी दिली.
तसेच सेप्टिक टँक व नालेसफाई करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळते की नाही, याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी समाजकल्याण अधिकारी, महामंडळ व विविध विभागांचे अधिकारी, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपायुक्त तुकाराम कदम, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, लेखा अधिकारी अमोल सोळंके, नगर सचिव विकास रत्नपारखे, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, संगणक विभागप्रमुख अदनान कादरी, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, आयुक्तांचे स्वीय सहायक युवराज साबळे, उपमहापौरांचे स्वीय सहायक उमेश जाधव, सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


