प्रत्येक गावाला मुबलक व सुरळीत पाणी पुरवण्याचे निर्देश
परभणी, (प्रतिनिधी): पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत परभणी तालुक्यातील 65 गावांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने आज परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात प्रशासनाकडून आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीला आमदार राजेश विटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, संबधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा व पाणी, जलतारा शोषखड्डे, सिंचन सुविधा, भूजल पातळी, कृषी व पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा तसेच विविध पाणीपुरवठा योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी संबंधित विभागांकडून सद्यस्थिती व प्रस्तावित उपाययोजनांची माहिती घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली. विशेषतः जानेवारी महिन्यानंतर काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, अशी माहिती देण्यात आली. यापूर्वी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या काही विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने पर्यायी व्यवस्था उभारावी लागणार आहे. अशा गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्यावर चर्चा झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विंधनविहीर घेणे अथवा पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणे याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना करण्यात आली. तसेच प्रस्तावित आराखड्यात संबंधित गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली. तीन नवीन विहिरी व पाणीपुरवठ्यासंदर्भातील प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे आवश्यक असल्याने चारा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे, जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच भूजल पातळीतील घट लक्षात घेऊन पाणी वापराचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
परभणी तालुक्यातील 17 महसूल मंडळांमध्ये मागील वर्षी शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा आणि चालू वर्षातील पीक विम्याची सद्यस्थिती याबाबतही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. खरीप हंगामातील पीक परिस्थिती, शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि विमा योजनेच्या अनुषंगाने संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली. तालुक्यातील काही गावांमध्ये वीजपुरवठा नियमित सुरू ठेवण्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी वीजपुरवठा सुरळीत राहणे महत्त्वाचे असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यावर चर्चा झाली.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, विहीर खोलीकरण, नवीन विंधनविहिरी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, सिंचन आणि जलसंधारण या बाबींवर गावनिहाय नियोजन करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. सरपंच व स्थानिक प्रतिनिधींनी सिरसी बु., धर्मापुरी, पेडगाव, वडगाव तर्फे यासह विविध गावांमधील स्थानिक अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष वेधले.
शासनाच्या विविध दुष्काळ निवारण उपाययोजनांचा लाभ गरजू शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच आवश्यक प्रस्ताव व आगामी उपाययोजनांचे नियोजन करावे, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर, अजित वरपुडकर, पांडुरंग खिल्लारे, जितेंद्र देशमुख, गणेश घाटगे, प्रभाकर जैस्वाल, यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, उपमुख कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, व गट विकास अधिकारी श्री. जाधव यांच्यासह पंचायत समिती सदस्य, सरपंच, एकनाथ साळवे, विलास बाबर, संतोष देशमुख, शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते
*-*-*-*-*-*


