मुंबई, — : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती शक्यता लक्षात घेता, राज्यातील ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या गावांमध्ये टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करावा. तसेच, पाणीटंचाईसंदर्भात माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचीही दखल घेऊन संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यकतेनुसार तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणांना दिले.
राज्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना याआधीच दिल्या आहेत. पावसाचे प्रमाण, भूजल पातळीतील घट, विहिरींची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून टंचाईग्रस्त गावांची निश्चिती करावी, असेही त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटले आहेत किंवा उपलब्ध स्रोतांमधून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशा गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असेही मंत्री पाटील म्हणाले.
*माध्यमांतील बातम्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही*
पाणीटंचाईबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. पाणीटंचाईच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची खातरजमा करावी. पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकीय प्रक्रियेत विलंब न करता टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देशित केले.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांवर नियमित देखरेख ठेवून कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
0000


