परभणी (प्रतिनिधी) जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील सचिन अरुण गिरी यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या वतीने दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित २८ व्या दीक्षांत समारंभात पीएच.डी. (आचार्य) पदवी प्रदान करण्यात आली. शेतकरी कुटुंबातून पुढे येत उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या या यशामुळे कौसडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सचिन गिरी यांनी अन्नतंत्र महाविद्यालयाच्या अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान (Food Processing Technology) या विभागात “मराठवाडा विभागातील व्यावसायिक केळीच्या जातींच्या केळीच्या फुलांच्या पावडरचा वापर करून बहिर्वेधन (Extrusion) उत्पादनाच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास व गुणवत्ता मूल्यमापन” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. सदर संशोधन त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या संशोधनामध्ये केळीच्या फुलांसारख्या कृषी उपउत्पादनाचा मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास आणि उत्पादनांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन यावर अभ्यास करण्यात आला. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास आणि उपलब्ध कृषी संसाधनांचा अधिक प्रभावी वापर या दृष्टीने त्यांच्या संशोधन कार्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यांच्या या संशोधन प्रवासात संशोधन मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, सहकारी आणि कुटुंबीयांनीही वेळोवेळी सहकार्य करून त्यांना प्रोत्साहित केले.
सचिन अरुण गिरी यांचे वडील शेतकरी असून, अत्यंत मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून संशोधन क्षेत्रात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची ही शैक्षणिक वाटचाल प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कौसडी गावासह जिंतूर तालुक्यातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


