दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री यांनी परभणी येथे घेतले अंत्यदर्शन
परभणी, (प्रतिनिधी)- खासदार रामराव वडकुते यांचे अचानक निधन होणे ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. ते जनसामान्यांमध्ये राहणारे आणि सर्वसामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, एक लोकाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खासदार रामराव वडकुते हे सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडलेले आणि लोकांमध्ये रमणारे नेते होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. सामान्य माणसांचे प्रश्न ते नेहमीच आपुलकीने आणि तळमळीने मांडत असत.
विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी यशस्वीपणे न्याय दिला. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठी आत्मीयता आणि विश्वास होता. असे लोकाभिमुख नेतृत्व अचानक हरपल्याने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, परभणी शहराचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे रविवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उद्या सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
***


