परभणी :(प्रतिनिधी) मानवत येथील एका १५ वर्षीय मुलीच्या हृदयातील जन्मजात छिद्रावर परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या आर. पी. हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे नि:शुल्क झालेल्या उपचारामुळे मुलीला नवजीवन मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून तिच्या श्वसनाचा आणि थकव्याचा त्रास दूर झाला आहे.
या यशस्वी उपचारामुळे आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने पुन्हा एकदा आरोग्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली आहे.
मानवत येथील ही मुलगी गेल्या ३ वर्षांपासून दम लागणे, सतत थकवा जाणवणे आणि उच्च व कमी रक्तदाबाच्या त्रासाने ग्रासली होती. तिच्या हृदयाची २डी इको तपासणी केली असता, तिच्या हृदयाला जन्मजात छिद्र असल्याचे समजले. यासोबतच तिला संधिवाताचा गंभीर आजार जडला होता. या दुहेरी आजारामुळे तिला रात्री शांत झोप येत नव्हती, तसेच वयानुसार आवश्यक शारीरिक वाढही खुंटली होती. मुलीच्या उपचारांसाठी तिच्या कुटुंबीयांनी नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवले; मात्र गुंतागुंतीच्या प्रकृतीमुळे सर्वत्र उपचार नाकारले गेले. अखेर, हताश झालेल्या कुटुंबीयांनी परभणीतील आर. पी. हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांना मदतीचा हात पुढे केला.
आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कुबडे यांच्या चमूने अत्यंत कौशल्याने आणि अचूकतेने हृदयातील छिद्र बंद करण्याची ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.यात डॉ. सलाम तांबोळी, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. संतोष हराळ, बालरोग तज्ज्ञ डॉ. बडे,डॉ.गिरी,डॉ. अकिब यांच्यासह परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
यावेळी मुलीच्या आईने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमच्या मुलीच्या उपचारांसाठी आम्ही मोठ्या शहरांत खूप फिरलो, पण कोठेही यश आले नाही. तिला प्रचंड त्रास होत होता, रात्री झोपही लागत नव्हती आणि तिची शारीरिक वाढही थांबली होती. आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. मात्र आर.पी. हॉस्पिटलने आमच्या मुलीवर मोफत शस्त्रक्रिया करून तिला नवीन जीवनदान दिले असून आम्ही डॉक्टरांचे आणि रुग्णालय प्रशासनाचे जन्मभर ऋणी राहू असे सांगितले.
आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, सामान्य आणि गरजू रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा परभणीत पूर्णपणे नि:शुल्क मिळावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे. मोठ्या शहरांत शस्त्रक्रीया न झालेल्या या मुलीवर आमच्या डॉक्टरांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला नवजीवन दिल्याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यातही आर.पी. हॉस्पिटलचा मदतीचा हात गोरगरीब रुग्णांसाठी सदैव तत्पर राहील असे मत व्यक्त केले.


