परभणी, (प्रतिनिधी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनाही अमृतच्या ‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील लक्षित गटातील पात्र युवक-युवतींसाठी ‘अमृत ड्रोन मिशन’ राबविण्यात येत आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सर्वेक्षण तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा या मिशनचा प्रमुख उद्देश आहे. युवकांना दर्जेदार व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
अमृत आणि टीआरटीआय यांच्यातील सामंजस्य करारानुसार टीआरटीआयच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही ‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आदिवासी युवक-युवतींना आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. शेतीमध्ये फवारणी, पीक निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, मॅपिंग तसेच विविध तांत्रिक कामांसाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याने प्रशिक्षित ड्रोन पायलटसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना नोकरीबरोबरच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधता येणार आहे.
अमृत आणि टीआरटीआय यांच्यातील हे सहकार्य आदिवासी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कौशल्यविकास, तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून युवकांच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या प्रशिक्षण संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन टीआरटीआयच्या वतीने निलेश सागर यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहिती व अर्जासाठी www.amrutdronemission.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
*-*-*-*-*-


