परभणी, (प्रतिनिधी): कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी शिक्षण हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. हीच बाब लक्षात घेऊन, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य व कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील १०० जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘वारे गुरुजी पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘उत्कर्ष परभणी’ या नावाने ‘पालकमंत्री रयतेची शाळा’ अभियान जिल्ह्यात राबवले जाणार आहे.
जालिंदरनगर शाळेला अभ्यास भेट आणि शिक्षकांचे प्रबोधन
या शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून परभणी जिल्ह्यातील निवडक १०० शाळांमधील २०० शिक्षकांच्या तुकडीने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे समर्पित शिक्षक दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या जालिंदरनगर (जि. पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेला अभ्यास भेट दिली.
या भेटीदरम्यान श्री. वारे गुरुजी यांनी उपस्थित २०० शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. शाळेचा कायापालट कसा घडवला, लोकसहभाग कसा उभा केला, आणि आनंददायी व कृतिशील शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवली, याचा संपूर्ण प्रवास त्यांनी शिक्षकांसमोर उलगडून दाखवला. श्री. वारे गुरुजींच्या या प्रेरणादायी आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शनाने परभणीचे सर्व शिक्षक अत्यंत प्रभावित झाले. प्रत्यक्ष शाळेतील रचना, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून हे सर्व शिक्षक आपल्या गावातील शाळा बदलण्याचा आणि परभणीत शैक्षणिक क्रांती घडवण्याचा ठाम निर्धार घेऊन परभणीकडे रवाना झाले आहेत.
वाबळेवाडी-जालिंदरनगरच्या प्रेरणेतून परभणी बनणार शिक्षणाची प्रयोगभूमी*
प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत दत्तात्रेय वारे गुरुजी यांनी यापूर्वी वाबळेवाडी आणि आता जालिंदरनगर येथे शिक्षणाची नंदनवने उभारली आहेत; त्यांच्या या असामान्य कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या एक संवेदनशील लोकप्रतिनिधी असून ग्रामीण शिक्षणाविषयी त्यांना विशेष तळमळ आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा उपक्रम परभणी जिल्ह्याचे शैक्षणिक चित्र पूर्णपणे बदलणारा ठरेल. श्री. वारे गुरुजींची प्रेरणा आणि पालकमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा यांच्या समन्वयातून परभणी जिल्हा येत्या काळात राज्यासाठी ‘शिक्षणाची प्रयोगभूमी’ बनेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

*शासकीय उपक्रमापलीकडे जाऊन ‘लोकचळवळीचे’ स्वरूप*
‘उत्कर्ष परभणी’ हे अभियान केवळ एक शासकीय योजना किंवा उपक्रम राहणार नसून, याला व्यापक लोकसहभागाच्या चळवळीचे स्वरूप दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताच सुधारणार नाही, तर गावागावांत सामाजिक ऐक्याचा आणि सामूहिक जबाबदारीचा हेतूही साध्य होईल.
येत्या काळात पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील ‘शिक्षणाची पंढरी’ परभणी जिल्ह्यात नक्कीच साकार होईल, असा विश्वास पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी अतुल चव्हाण, डॉ. अशोक दांडगे, रवींद्र सासमकर, शिक्षण अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
***


