परभणी,(प्रतिनिधी) : सेवानिवृत्त शिक्षिकेचे थकीत वेतन अदा करण्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यासह कर्मचार्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली परंतु, अचानक प्रकृती बिघडल्याचे निमित्त समोर करीत दोघा आरोपींनी जिल्हा रुग्णालयातील आयसीयु कक्षात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत आराम केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्शीकर व समाजकल्याण विभागात प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी शेख असलम शेख रज्जाक या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने गुरुवारी रात्री उशीरा 1 लाख 80 हजार रुपयांची लाच स्विकारल्याबद्दल ताब्यात घेतले. संपूर्ण कारवाई पूर्ण करीत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. अन् या दोघांना अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ शुक्रवारी दुपारी दोघा आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली. या दोघांना पोलीसांनी तातडीने पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी या दोघांनी प्रकृती बिघडल्याची तक्रारी सुरु केली. तेव्हा पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.अन या दोघांना रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल केल्या गेले. त्या ठिकाणीच या दोघांनी आराम केला. सकाळी उशीरा काहींनी या दोघा आरोपींना मिळणार्या ट्रीटमेंट बद्दल शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यातच माशी कुठे शिंकली कळलं नाही लगेचच पोलीस व जिल्हा शासकीय रुग्णालयातील यंत्रणा खडबडून जागी झाली. अन् त्या दोघा पैकी एकाआरोपींची शनिवारी दुपारी तडकाफडकी सुट्टी करण्यात आली.
दरम्यान, या दोघा आरोपींना अचानक एकाच वेळी काल दुपारी नेमका काय त्रास झाला, त्याचे नेमके स्वरूप व गांभीर्य कितपत होते, या दोघांना एकाच वेळी आयसीयूत दाखल करण्यापर्यंत नेमके काय घडले, रुग्णालयाने कोणत्या तपासण्या केल्या अन् कोणता औषधोपचार केला या बाबत जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलीस यंत्रणेने दुपारी उशीरापर्यंत ओळीनेसुध्दा खुलासा केला नाही. त्यामुळे या प्रकरणात शंका-कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.


