परभणी प्रतिनिधी : लोकसभा च्या तुलनेत विधानसभेला जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे जेणेकरून जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढेल. आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देखील या वेळेस जिल्हाधिकारी गावंडे यांनी दिली.
आज बुधवार दिनांक 1५ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या घोषणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. काल निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा 2024 ची घोषणा करण्यात आली 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे अधिसूचना जारी करणे 29 ऑक्टोबर रोजी नाव निर्देश पत्र दाखल करणे 30 ऑक्टोबर रोजी छाननी 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेणे शेवटची तारीख तर 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्यानंतर 23 रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावनीस सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणेच त्या त्या ठिकाणी मुख्य चौक, मुख्य रस्त्यांवरील छोटे मोठे होर्डीग्ज, झेंडे व अन्य काही साहित्य हटविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावनी करीता तसेच उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्याकरीता विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक विधानसभा स्तरावर एक लेखापथक, 14 फिरते पथक, 20 स्थिर सर्वेक्षण पथक, 16 व्हिडीओ चित्रीकरण पथक, 6 व्हिडीओ पाहणी पथक स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा निहाय एक मतदान केंद्रावर केवळ 1 महिला मतदान अधिकारी असणार आहेत. एका ठिकाणी केवळ दिव्यांग मतदान अधिकारी असतील व एका ठिकाणी केवळ तरुण अधिकारी हे मतदान अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
15 लाख 44 हजार 451 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
15 ऑक्टोंबरपर्यंत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 17 हजार 169 पुरुष, 2 लाख 1 हजार 997 महिला, 5 तृतीयपंथी असे एकूण 4 लाख 19 हजार 171 व सैन्य दलातील 774 असे एकूण 4 लाख 19 हजार 945 मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ पाथरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 1 हजार 824 पुरुष, 1 लाख 88 हजार 721 महिला, 2 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 90 हजार 547 व सैन्य दलातील 148 असे एकूण 3 लाख 90 हजार 695 मतदार नोंदविण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ जिंतूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 98 हजार 932 पुरुष, 1 लाख 96 हजार 440 महिला, 11 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 85 हजार 383, सैन्य दलातील 94 असे एकूण 3 लाख 85 हजार 477 मतदार नोंदविण्यात आले आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात 1 लाख 77 हजार 789 पुरुष, 1 लाख 70 हजार 372 महिला, 11 तृतीयपंथी असे एकूण 3 लाखा 48 हजार 172, सैन्य दलातील 162 असे एकूण 3 लाख 48 हजार 334 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 7 लाख 95 हजार 714 पुरुष, 7 लाख 47 हजार 530 महिला, 29 तृतीयपंथी, 1 हजार 178 सैन्य दलातील असे एकूण 15 लाख 44 हजार 451 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
7 हजार 811 दिव्यांग मतदार….
चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 7 हजार 811 दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात जिंतूरात 1 हजार 267, परभणीत 2 हजार 323, गंगाखेडात 1 हजार 995, पाथरीत 2 हजार 226 असे एकूण 7 हजार 811 दिव्यांग मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर जिल्ह्यात एकूण 24 हजार 343 वयोवृध्द म्हणजे 85 वर्षावरील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात जिंतूरात 7 हजार 991, परभणीत 3 हजार 567, गंगाखेडात 6 हजार 762, पाथरीत 6 हजार 323 मतदारांचा समावेश आहे.
37 हजार 118 युवा मतदार…
संपूर्ण जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटातील 37 हजार 118 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिंतूरात 9 हजार 94, परभणीत 8 हजार 669, गंगाखेडात 10 हजार 490, पाथरीत 8 हजार 865 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.