परभणी, (प्रतिनिधी) – 96-परभणी विधानसभा मतदारसंघातील 2024 विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या कमिशनिंग व सिलिंग प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या प्रक्रियेत झोनल अधिकारी, मास्टर ट्रेनर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी समजावून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डीपीडीसी हॉलमध्ये आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, तहसिलदार आम्रपाली कासोदेकर, उमाजी बोथीकर, नायब तहसिलदार अनिता वडवळकर, गणेश चव्हाण, विष्णू पकवाने, मधुकर क्षीरसागर, सतीश रेड्डी, अनिकेत पालेपवाड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य विकास आडे, तसेच परभणी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे आणि सोमनाथ बनसोडे उपस्थित होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमिशनिंग व सिलिंग प्रक्रियेचे महत्त्व, काटेकोरता आणि विहित कालमर्यादेतील पूर्तता यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीतील प्रत्येक जबाबदारीचे महत्व पटवून सांगितले आणि या प्रक्रियेला पूर्ण शिस्त आणि दक्षतेने हाताळण्याचे आवाहन केले.
आगामी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमिशनिंग व सिलिंग आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रियेतील विविध स्तरांवर असलेल्या जबाबदाऱ्या पाळण्यास सर्व अधिकारी आणि कर्मचारी सज्ज होतील, ज्यामुळे निवडणुकीची तयारी आणखी भक्कम होणार आहे.


