निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी यांनी रॅलीस दाखवली हिरवी झेंडी
परभणी, (प्रतिनिधी)- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी स्वीपच्या माध्यमातून परभणी शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅलीस विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
निवडणूक निरीक्षक श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक संचिता बिष्णोई, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्यास अवश्य सांगावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी रॅलीमध्ये धावले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मॅरेथॉन रॅलीची सुरुवात सकाळी 7.15 वाजता शनिवार बाजार मैदान येथून पुढे नानलपेठ पोलीस स्टेशन-शिवाजी चौक-गांधी पार्क-आर.आर.टावर-विसावा कॉर्नर-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने राजगोपालचारी उद्यान येथे रॅलीचा समारोप झाला. समारोप ठिकाणी रॅलीत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्र्राफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
जास्तीतजास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. तर पोलीस अधीक्षक यांनी देखील मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस यांनी केले. (छाया- उत्तम बोरसुरीकर)


