परभणी,(प्रतिनिधी) : परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे होमपीच आहे. या जिल्ह्यानेच सातत्याने हिंदुत्वास कौल दिला आहे. या निवडणूकीतसुध्दा सामान्य जनता हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल. बालेकिल्ल्यावर भगवाच फडकेल व हिंदुत्व पूर्णतः विसरलेल्या ठाकरे गटास भानावर आणेल, असा विश्वास खा.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला
महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खासदार शिंदे यांची शुक्रवारी (दि.15) परभणीत जिंतूर रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन्सवर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवार भरोसे, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव पाटील, जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे, प्रथम महापौर प्रताप देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, युवासेनेचे आप्पाराव वावरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्यासपीठावर विराजमान होते.
पुढे बोलताना खा.शिंदे म्हणाले की, सत्ता आणि खूर्ची यासाठीच ठाकरेंनी गेल्या निवडणूकीच्या निकाला पाठोपाठ काँग्रेसजणांशी लोटांगण घातले. पुढे शिवसेनेचे, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हच काँग्रेसजणांकडे गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकनाथराव शिंदे यांनी ठाकरे यांचा तो प्रयत्न हाणून पाडला, असे नमूद केले. हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि धनुष्यबाण या दोन गोष्टी जीवापाड जपल्या. परंतु, त्यांचे सुपूत्र उध्दव ठाकरे यांनी वडीलांच्या पश्चात संपूर्ण सेनाच काँग्रेसच्या दावणीस बांधली, लाचार होवून सातत्याने रंग बदलले. पुढे धनुष्यबाणसुध्दा गहाण ठेवून हिंदुत्वास तिलांजली दिली.
उध्दव ठाकरे यांच्या परभणी दौर्यातील सभेत हिंदुत्वाचा नामोल्लेखही झाला नाही, हे बदलत्या रंगाचे द्योतक आहे, हिंदुर्हदयसम्राट ठाकरे यांच्या स्वप्नांना तिलांजली दिली आणि आता काँग्रेसच्या दावणीला जुंपून हेच ठाकरे महायुतीवर टिका टिप्पणी करु लागले आहेत. यातून ठाकरे यांची हास्यास्पद आणि लांछनास्पद भूमिका लक्षात येते, असे शिंदे यांनी म्हटले. सभेस मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.



