परभणी (प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी व बाल कल्याण समिती, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विद्यामंदिर वैभव नगर, परभणी येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर आणि सचिव अर्चना एम. तामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समिती परभणी चे अध्यक्ष ॲड. रवींद्र कातनेश्वरकर समितीच्या सदस्या ॲड. वनिता काळवीट सेलूकर, श्रीमती अर्चना मेश्राम तर पोलीस विभागातील भरोसा सेल च्या उपनिरीक्षक स्वाती कवाळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी साक्षरता मंडळ क्रमांक एक चे विभाग प्रमुख तथा समूपदेशक प्रवीण सोनोने यांनी केले. यामधून त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या कार्याविषयी माहिती सांगून कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शना मागील हेतू विषद केला.
याप्रसंगी ॲड. वनिता काळवीट सेलूकर यांनी विद्यार्थ्यांना *पोक्सो कायद्याबद्दल* माहिती सांगून गुड टच बॅड टच, बाल न्यायालय तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर अर्चना मेश्राम यांनी *अंमली पदार्थाचे दुष्परिणाम* तसेच मोबाईलची उपयोगिता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
पोलीस उपनिरीक्षक स्वाती कवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून *विद्यार्थ्यांनी स्वतःला व्यसनापासून दूर ठेवण्याविषयी माहिती सांगितली* व अडचणीच्या प्रसंगी चाइल्ड हेल्पलाइनची मदत घेण्याचे आवाहन केले.
यानंतर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक ॲड. रवींद्र कातनेश्वरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजात घडणाऱ्या अनेक विविध घटनांची माहिती दिली यामधून बालहक्क रक्षण या विषयी माहिती देत *कायदा माणसाच्या आयुष्यातील रूक्षता कमी करतो* असे विषद करीत माणसातील प्रवृत्ती, बालविवाह, लिंग भेद या विषयी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण बोराडे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात *विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी व विकासासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे* सांगून समूह मित्रां ऐवजी सन्मित्र ठेवा व रिल्स मॉडेल बनण्याच्या ऐवजी रोल मॉडेल बनण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण सोनोने यांनी केले. तर आभार प्रशालेचे शिक्षक बाळाभाऊ दंडवते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


