परभणी,(प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 ते 26 जानेवारी दरम्यान भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते व आयुष अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर वडमिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रांगणात नियोजना करिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निरामय योग केंद्राचे अध्यक्ष डॉ. राहुल झांबड, आरोग्य वर्धिनीचे योग प्रशिक्षक गजानन चौधरी, सचिन रायपत्रीवार, सुंदरदास मोरे, विद्याताई खंदारे, वसंत पारवे, अशोक तळेकर, चंद्रकांत देशमुख, कैलास बेले, सोनी सोळंके, पूजा ढाकरगे आदींची उपस्थिती होती.
शिबिरात सहभाग घेणार्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांना निरामय योग प्रसार संशोधन केंद्राचे तसेच आरोग्य वर्धिनी व आयुष केंद्राचे योग प्रशिक्षक व योग शिक्षक विविध यौगिक क्रिया, प्राणायाम, ध्यानक्रिया आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा जिल्हा परिषद अधिकारी व सर्व कर्मचार्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


