परभणी,(प्रतिनिधी) : येथील गुरुतत्व प्रदीप परभणी आयोजित 108 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सोहळ्यास मंगळवारी (दि.17) येथील रंगनाथ नगरातील वैष्णवी मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रारंभ झाला.

येथील गुरुतत्व प्रदीप या परिवाराच्या वतीने घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावे या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील एका वर्षाच्या कालखंडात या परिवारातर्फे 108 व 1008 पारायणाचे सामुदायिक कार्यक्रम सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने यथोचित व यशस्वीरीत्या पार पडले होते. अधिकाधिक विभागात याच पध्दतीने गुरुतत्व बोधाचा दीप प्रज्वलित व्हावा या दृष्टीने या परिवाराने अधिकाधिक वाचक, साधक, श्रोता, दाता व संदेशवाहक यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून वैष्णवी मंगल कार्यालयात मंगळवारी या पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळात अभिषेक, 9 ते 12 या वेळेत श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, दुपारी 12 ते 2 भिक्षा, नैवेद्य, आरती व प्रसाद तर 3 ते 6.30 या वेळेत श्रीगुरुचरित्र कथामृत आरती व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


