पुणे, (प्रतिनिधी) : गेल्या ३० ते ४० वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलामुळे जीवन गुंतागुंतीचे झाले असून मानवी जीवन गोंधळलेल्या अवस्थेत आहे, अशा वेळी भारतीय संतांसह लुईस हे आणि ‘सिक्रेट’च्या लेखिका रोंडा बर्न यांच्यासारख्या पाश्चिमात्य तत्वज्ञाच्या विचारांचा आढावा घेणारे ‘कोण दाखवीलं वाट’ हे पुस्तक तरुणांना दिशा दाखविणारे आहे, असा विश्वास एम.जी.एम. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केला.
अथश्री पेबल्सच्या मल्टी पर्पज सभागृहात झालेल्या स्तंभलेखक श्रीनिवास बेलसरे यांच्या “कोण दाखवील वाट” या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळकर, जेष्ठ पत्रकार संपादक यमाजी मालकर, लेखक श्रीनिवास बेलसरे उपस्थित होते.
माजी मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, ‘लेखकाने श्रीरामावरील लेखात रामाचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य त्याने नेहमी केलेला त्याग आहे असे दाखवून दिले. संभ्रमित झालेल्या लोकांना पुन्हा योग्य वाटेवर आणण्यासाठी “कोण दाखवलील वाट” हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. आज २१ टक्के युवक तणावाखाली जगत आहेत, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशांना या पुस्तकातून प्रेरणा मिळेल.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती पाटील यांनाही आपले विचार व्यक्त केले.
माजी कुलगुरू डॉ. वेळूकर म्हणाले ‘पुस्तकात जागोजागी सर्वधर्म समभावाचा प्रत्यय येतो. राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीसाठी पुस्तकाचे योगदान मोठे असेल.
जेष्ठ पत्रकार श्री. मालकर यांनी पुस्तकातील ४५ लेखाचा संक्षिप्त आढावा घेतला.
लेखक बेलसरे म्हणाले ‘गुरुबिन’ हा स्तंभ लिहिताना जेव्हा विविध संत आणि चिंतकांचे विचार वाचले तेव्हा समुद्रकिनाऱ्यांवर अनेक चमचमते शंख शिंपले सापडत जाणाऱ्या लहान मुलासारखी माझी अवस्था झाली. मला सापडलेले हे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले.
कार्यक्रमास चिंतन सेंटरचे प्रमुख चिंतन थोरात, डॉ.परवेज खान, बांधकाम व्यावसायिक अतुल लुंकड तसेच पुस्तकप्रेमी उपस्थित होते.


