अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीचा घेतला सविस्तर आढावा
परभणी, (प्रतिनिधी) : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य सुभाष राऊत यांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत घेतला.

बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण अधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तालुक्यातील पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा पुरवठा, रेशन दुकानदारांकडून होणारे वितरण, लाभार्थ्यांची नोंदणी तसेच अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहे का याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अन्नधान्य वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेशन दुकानदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला.
कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये. उसतोड, वीटभट्टी कामगार तसेच बसस्थानक परिसरातील गरजू व भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींपर्यंतही अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांची नियमित पडताळणी करून खरोखर पात्र असणाऱ्यांनाच लाभ मिळावा व ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, अशा अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेबाबतही त्यांनी मार्गदर्शन करत, ज्यांना खरोखर दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण आहे, अशा गरजू नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये अंत्योदय कार्ड वाटप तसेच इतर योजनांचे लाभ देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याबाबतही त्यांनी सूचना त्यांनी दिल्या.
प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी विशेष लक्ष देण्यास सांगितले. शाळांमध्ये स्वच्छता राखणे तसेच अन्न बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, राज्य अन्न आयोगाच्या सूचनांनुसार जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. समाजातील असहाय्य, निराधार व वंचित घटकांना अंत्योदय अन्न योजना व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. भिक्षा मागणाऱ्या बालकांमागील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी. तसेच शासनाचे अन्न सुरक्षेबाबतचे धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे त्यांनी सूचित केले.
बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील अन्नधान्य वितरणाची सद्यस्थिती, रेशनकार्डधारकांची संख्या तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती सादर करण्यात आली. नागरिकांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, संबंधित विभागांचे प्रतिनिधी तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*-*-*-*-*


