परभणी, (प्रतिनिधी) दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश स्तनपानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, नवमातांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच स्तनपानाबाबतचे समज-गैरसमज दूर करणे हा आहे. यंदाच्या जागतिक स्तनपान आठवडा सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा (सीपीएससी) प्रशिक्षणात प्रशिक्षकांद्वारे “स्तनपान प्रशिक्षणात” वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य कर्मचारी ,व आशा स्वयंसेविका यांना आई आणि बाळा मधील अंतर कमी करून स्तनपान समर्थनासाठी सातत्याने प्रत्येक मातेपर्यंत योग्य स्तनपान पोहोचण्याकरिता जनजागृती संदेश देण्यात येत आहे. स्तनपानाचे महत्त्व व मातेला व बाळाला होणारे फायदे याविषयी प्रशिक्षणातून माहिती दिली जात आहे.
स्तनपान सप्ताह यावर्षीचे संकल्पना आहे –
“शाश्वत जीवनाची सुदृढ सुरुवात स्तनपानातूनः जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करूया.” या संकल्पनेचा मुख्य हेतू स्तनपानाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व उपाययोजना अधिक प्रभावी करणे आणि प्रत्येक नवजात बालकाला आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळवून देणे हा आहे. यासाठी जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणे आणि पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जन्मानंतर आईच्या स्तनातून येणारा पहिला पिवळसर दाट द्रव म्हणजे ‘चीक’. हा बाळासाठी अमृतासमान असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पहिला नैसर्गिक संरक्षक कवच आहे. बाळासाठी स्तनपानाचे फायदे जन्मापासून सहा महिने संपूर्ण आणि संतुलित पोषण मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते व संसर्गाचा धोका कमी होतो. अतिसार, न्यूमोनिया, कानाचे आजार आणि इतर संसर्गापासून संरक्षण मिळते. मेंदूचा विका उत्तम होऊन बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. पचनक्रिया सुरळीत राहते
व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. लठ्ठपणा, मधुमेह आणि काही दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊ शकतो.. आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होते. आईसाठी स्तनपानाचे फायदे प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो. स्तन व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. टाइप-२ मधुमेह आणि काही हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. स्वच्छ, सुरक्षित, सहज उपलब्ध आणि किफायतशीर पोषणाचा पर्याय आहे. आईचा आत्मविश्वास वाढतो आणि बाळाशी भावनिक जवळीक अधिक दृढ होते.
स्तनपानाची योग्य पद्धत जन्मानंतर शक्यतो पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करावे. पहिले सहा महिने केवळ आईचे दूध द्यावे. पाणी, मथ, गुटी किंवा इतर कोणताही आहार देऊ नये. बाळाला भूक लागेल तेव्हा मागणीनुसार स्तनपान करावे. स्तनपान करताना आई आरामदायी स्थितीत बसावी किंवा झोपावी. सहा महिन्यांनंतर पूरक आहार सुरू करून दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे. आपली जबाबदारी स्तनपान हा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क आणि आईकडून मिळणारी सर्वोत्तम नैसर्गिक भेट आहे. योग्य माहिती, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रत्येक बालकाला स्तनपानाचा लाभ मिळू शकतो. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाबाबत जनजागृती करूया, समज-गैरसमज दूर करूया आणि प्रत्येक मातेला स्तनपानासाठी प्रोत्साहन देऊया.
*-*-*-*


