परभणी,(प्रतिनिधी) : श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थानच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी (दि.15) येथील सोनार समाज बांधवांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
मध्यवस्तीतील कोमटी गल्लीतील राम मंदिरापासून सकाळी 9 वाजता या पालखी मिरवणूकीस प्रारंभ झाला.

यावेळी मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष, युवक व युवती सहभागी झाले होते. गुजरी बाजार, छत्रपती शिवाजी चौक मार्गे नानलपेठ कॉर्नर व तेथून पालखी मिरवणूकीने नांदखेडा रस्त्यावरील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मंदिराकडे प्रस्थान केले. त्या ठिकाणी या पालखीचा समारोप झाला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते महापुजा करण्यात आली. तर दुपारी हभप अॅड. सच्चिदानंद महाराज कुलकर्णी परचुंडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाप्रसादाने या कार्यक्रमांचा समारोप झाला.


