परभणी,(प्रतिनिधी) : सेलू तालुक्यातील राजेवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघा मोटारसायकलस्वारांपैकी मारोती रामभाऊ हरकळ (वय 50, रा. वालूर) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास डुघरा-कवडधन शिवारात आढळून आला.
लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर दुधना नदीच्या पाणीपात्रात पाणी सोडल्या जात असून त्यामुळे दुधना नदीस मोठा पूर आला आहे. राजेवाडी येथील पुलावरुन पुराचे पाणी धोकादायक पध्दतीने वाहत आहे. असे असतांनासुध्दा दुचाकीस्वारांनी त्या पुराच्या पाण्यातून पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यात दुर्देवाने ते दोघे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने नदीपात्रात वाहून गेले. प्रत्यक्षदर्शनींनी त्या दोघांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न फोल ठरले. सेलूतील महसूल, पोलिस व आपत्कालीन विभागातील पथकाने मंगळवारी रात्रीपर्यंत शोध मोहिम सुरुच ठेवली. नदी काठावरील दुतर्फा गावांमधील ग्रामस्थांनीसुध्दा प्रयत्नांची पराकाष्टा केली.
सेलू येथील उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, तहसीलदार व कर्मचारी शोध मोहिमेवर नजर ठेवून होते. दुपारी 4 वाजेपर्यंत छब्बुराव श्रीरंगराव जावळे (वय 45, रा. गुळखंड) यांचा शोध सुरु होता.


