परभणी (प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना ज्ञात होणं गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विकसित करणे गरजेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी पालक व शिक्षक यांनी सजग व जागृत राहणे आवश्यक आहे. करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात आता स्पर्धात्मक परीक्षेचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे आहे. अशा स्पर्धात्मक परीक्षेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देऊन त्यांच्या मूलभूत संकल्पना विकसित केल्या पाहिजे.* असे प्रतिपादन बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी केले.
शहरातील बाल विद्या फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. ए. झरकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष ॲड. विलास पोहंडूळकर, सहसचिव ॲड. संजय देशपांडे, सदस्या सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर आदी उपस्थित होते.
प्रसंगी बाल विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण बोराडे, वैभवनगर शाखेचे पर्यवेक्षक प्रदीप रूघे, पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर, बाल विद्याविहारचे विभागप्रमुख नितीन गोराडकर, बाल विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल रमेश कापसे, प्रा. डॉ. संजय मोरे, सुनिल घुगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉॅ. विवेक नावंदर म्हणाले की, * बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. भविष्याचा वेध घेऊन संस्थेने बाल विद्या फाउंडेशनची उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतोत. परभणी सारख्या शहरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या पायाभूत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. १०वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी परभणीतील विद्यार्थ्यांना नांदेड, लातूर सारख्या ठिकाणी जावे लागते. पालकांना संपूर्ण परिवार तिथे स्थलांतरित करावा लागतो, ज्यामुळे आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो.याच समस्येवर उपाय म्हणून आम्ही परभणीतील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच NEET आणि JEE सारख्या परीक्षांची तयारी करण्याची सोय निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.”*
प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. अनिता नावंदर म्हणाल्या की, विद्यार्थ्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जायचे असेल तर शिक्षक व पालक यांचा समन्वय असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा त्रिकोण याच्या दोन बाजू पालक व शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षक पालक व विद्यार्थी हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी माता-पालक यांनी आपला अधिकचा वेळ विद्यार्थ्यांसोबत दिला पाहिजे.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलास पोहंडूळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पालकांनी मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. जिद्द,परिश्रम, मेहनत व सातत्य हे यशाचे मूलमंत्र आहेत. ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजेत.
यावेळी संस्थेचे सहसचिव ॲड. संजय देशपांडे यांनी उपस्थित त्यांना व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. एन.ए. झरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीनुसार करिअरची संधी द्यावी. शिक्षकांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय मोरे यांनी केले. तर सुत्रसंचलन सुभाष ढगे यांनी केले. आभार सुनिल घुगे यांनी मानले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विद्या फाउंडेशनच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


