परभणी,(प्रतिनिधी) आशा स्वंयसेविका, अंगणवाडी ताई व मदतनीस या नेहमी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करत असतात. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजासाठी काम केलं. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील.असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.
डॉ. राहुल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त शिवसेना महानगरप्रमुख प्रमुख डॉ. विवेक भाऊ नावंदर मित्र मंडळाच्यावतीने अक्षदा मंगल कार्यालयात मंगळवारी (दि.14) आशा सेविका, अंगणवाडी ताई व मदतनीस यांना साडीवाटप व फराळ वाटप करण्यात आले.यावेळी आमदार डॉ.पाटील बोलत होते.
यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड. अशोक सोनी, व्यापारी महासंघाचे सूर्यकांत हाके, बंडू नाना सराफ, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. माधुरीताई क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रकल्प) रेखा माळंके , महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर,पोलीस अधीक्षक वीरेंद्रसिंह परदेशी,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.अंबिकाताई डहाळे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले, मराठवाड्यासह मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे परम कर्तव्य आहे. परंतु वाढदिवस साध्या पद्धतीने उपक्रमशील कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे मला याचा आनंद आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचा मानस असून येणाऱ्या काळात अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण करूया. तरुणांना रोजगार, महिलांना स्वयंपूर्ण बनवणे, वृद्धांसाठी आनंददायी वातावरण देणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर आयुष्यभर भर राहील.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नावंदर यांनी प्रास्ताविक करताना आमदार डॉ.पाटील यांच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले.


