सेलू: ( प्रतिनिधी) आपण जीवनात चांगला माणूस व्हायला हवे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे, स्वतःशी प्रामाणिक राहावे. आईवडील, शिक्षक हेच आपले खरे मार्गदर्शक असतात.आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव सदैव असावी. ” असे प्रतिपादन लेखापाल ( सी.ए. ) सर्वेश काबरा यांनी केले. श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता बारावीतील विद्यार्थीनींसाठी आयोजित शुभेच्छा आणि निरोप समारंभ कार्यक्रम मंगळवार ( दि. ०३ ) रोजी नूतन कन्या प्रशालेच्या कै. सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी लेखापाल ( सी.ए. ) सर्वेश काबरा, ॲड. रूपाली होके या होत्या. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी हे होते. तर व्यासपीठावर मुख्याध्यापक निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सर्वेश काबरा म्हणाले की, ” नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने आपल्यावर संस्कार केले आहेत. आपला आत्मविश्वास वाढविला आहे. त्या गुरूजनांनी दिलेल्या ज्ञान सामर्थ्याच्या बळावर आपण यशोशिखर गाठायला हवे. ”
आपल्या कर्तृत्वाने आईवडील, शाळेचे नाव मोठे करा –
ॲड. रूपाली होके आपल्या मनोगतात म्हणाल्या की, ” शिक्षणामुळे स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जीवन जगण्यासाठी नव्या वाटा खुल्या होतात. विद्यार्थीनींनी आत्मसंरक्षण करायला शिकले पाहिजे, मानसिक बळ वाढवावे. सामाज माध्यमांचा सजगपणे वापर करावा. सामाजिक माध्यमांतील चुकीच्या गोष्टींचे कधीही अनुकरण करू नये. स्वतः चे व्यक्तिमत्त्व विकासित करावे. आपल्या कर्तृत्वाने आईवडील, शिक्षक, शाळा, संस्थेचे नाव मोठे करावे. ”
विद्यार्थीनींनी परीक्षेला न घाबरता सामोरे जावे –
प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोपात ” विद्यार्थीनींनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे. शांत चित्ताने परीक्षा द्यावी. उच्च शिक्षणातून स्वतः चे व्यक्तिमत्त्व घडवावे आणि स्वतः च्या पायावर उभे राहावे.” अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात दिव्या डंबाळे, उर्मिला बनसोडे, भाग्यश्री आल्डे, वैष्णवी मोगल, भक्ती कांबळे या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. रेणुका अंबेकर यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक निशा पाटील यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.विजय धापसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र कदम यांनी केले. निरोप समारंभ यशस्वीतेसाठी प्रा. सपना पाटणी,प्रा.सुरेखा आगळे, डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ. सुरेश हिवाळे, भालचंद्र गांजापुरकर, किशोर ढोके, स्नेहल दगडू , बालाजी देऊळगावकर यांनी परिश्रम घेतले.


