परभणी, (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. मात्र, वसतिगृहासाठी अर्ज न करणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेश तसेच स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.
ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, तेथे हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील परीक्षेत किमान ५० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
शालेय अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
समाज कल्याण विभागांतर्गत मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह परभणी, मानवत, सेलू व पुर्णा येथे, तर मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह परभणी, सेलू, पुर्णा, मानवत व गंगाखेड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर भेट देऊन तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एच. एडके यांनी केले आहे.
*-*-*-*-*


