परभणी (प्रतिनिधी) आपल्या बहारदार आवाजाने महाराष्ट्राच्या संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या परभणीच्या युवा गायक शुभम मस्के याने झी वाहिनीवरील लोकप्रिय ‘सा रे ग म प’ या संगीत कार्यक्रमात दमदार कामगिरी करत टॉप-१२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याच्या या यशामुळे परभणीच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शुभम मस्के याने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सुरेल गायकीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परभणी शहरातील कला आणि सांस्कृतिक वातावरणात त्याची जडणघडण झाली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि आपल्या गायनाच्या प्रतिभेच्या बळावर त्याने झी वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ या प्रतिष्ठित संगीत मंचावर पदार्पण केले.
या कार्यक्रमातील आपल्या प्रत्येक सादरीकरणातून शुभमने दमदार आवाजाची झलक दाखवत रसिकांची मने जिंकली आहेत. त्याच्या सुरेल आवाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने ‘सा रे ग म प’च्या मंचावर परभणीची संगीत परंपरा पोहोचली आहे.
शुभमच्या या यशामुळे परभणीकरांचा अभिमान उंचावला असून, त्याला विजेतेपदाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी परभणीकरांनी मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभमला सपोर्ट करून त्याच्या गायनाच्या प्रवासाला बळ देण्याचे आवाहन कला, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.
परभणीच्या मातीतून घडलेला हा प्रतिभावंत युवा गायक आता महाराष्ट्राच्या संगीतविश्वात आपला ठसा उमटवत असून, शुभमच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण परभणीकरांचे लक्ष लागले आहे


