जिंतूर,प्रतिनिधी) : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (दि. 21) अचानक हिंसक वळण लागले. गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यावेळी आयशर ट्रक, ऑटो आणि स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी विनोद आडे हे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करीत आहेत. शासनाने मागणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे. सोमवारी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित असताना आडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या घटनेनंतर आंदोलनस्थळी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर आंदोलकांनी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको सुरू केला.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाही वाहतूक रोखण्यात आल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर असलेल्या आयशर ट्रक, ऑटो तसेच एका स्कूल व्हॅनची तोडफोड केली. या प्रकारामुळे वाहनचालक, नागरिक आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती शहरात पसरल्यानंतर व्यापार्यांमध्येही घबराट निर्माण झाली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही व्यापार्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत शुकशुकाट पसरला.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असतानाच सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आंदोलकांच्या मागणीवर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत असतानाच सार्वजनिक रस्ता अडविणे आणि वाहनांची तोडफोड केल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.


