परभणी, (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत रेशीम कार्यालय, परभणी यांच्या वतीने ५० रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जालना व अहिल्यानगर जिल्ह्यांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना तुती लागवड तंत्रज्ञान, रेशीम शेतीतील आधुनिक पद्धती आणि यांत्रिकीकरणाचे महत्त्व याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतीकामात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाची आवश्यकता, तुती रोपवाटिका लागवडीचे महत्त्व व फायदे, तुतीच्या विविध जाती तसेच तुती पिकावरील रोग व कीड नियंत्रण या विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लटपटे, प्रा. धनंजय मोहोड, डॉ. अश्विनी गावंडे तसेच केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन तथा प्रशिक्षण केंद्र येथे तुती लागवड व रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तुतीच्या विविध जातींची ओळख, पिकावरील रोग व कीड नियंत्रण, रोपवाटिकेचे नियोजन, वाफे तयार करण्याची पद्धत, दोन रोपांमधील अंतर, पाणी व्यवस्थापन आदी बाबींची माहिती देण्यात आली.
तसेच तुती लागवडीच्या विविध पद्धती आणि प्रत्येक पद्धतीसाठी उपयुक्त असलेली यांत्रिक अवजारे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले.
सहाय्यक प्राध्यापक धनंजय मोहोड, प्रा. डॉ. अश्विनी गावंडे आणि केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित तुती लागवड पद्धती, रोग व कीड नियंत्रण तसेच यांत्रिकीकरणाबाबत व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होत आहे.
प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी रेशीम कार्यालयाच्या वतीने सागर मिसाळ, गजानन काचगुंडे, श्री. वगदकर, श्री. जोगदंड, मुंडे, भालेराव तसेच श्रीमती तालडे यांनी सहकार्य केले.
***


