मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची संधी, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला होणार प्रसिद्ध
परभणी, (प्रतिनिधी) : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक आणि अद्ययावत होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारांनी गणना प्रपत्रातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक तपशील विहित मुदतीत सादर करावेत. विशेषतः अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या नोंदींची खात्री करून घ्यावी. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीविरहित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत सदर आवाहन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, श्री. गिनगिने यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी श्रीमती संगेवार यांनी मतदार यादी पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांसाठी गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच गणना प्रपत्रांचे वितरण, संकलन आणि पुढील कार्यवाहीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे.
या वेळापत्रकानुसार गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. गणना प्रपत्र निकाली काढण्याची प्रक्रिया १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांसाठी गणना प्रपत्र (Enumeration Form) ECINET प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मतदारांच्या याद्या परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (Parbhani.nic.in) तसेच मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्यामार्फत या मतदारांचे गणना प्रपत्र डाउनलोड करून त्याची मुद्रित प्रत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांची एकूण संख्या १ लाख ८० हजार २४९ इतकी आहे. यामध्ये ३७ हजार ४०८ मृत, ४२ हजार ५७४ अनुपस्थित, ७३ हजार ६२८ स्थलांतरित, ६५६ इतर आणि २५ हजार ९८३ दुबार नोंदी असलेल्या मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. ९५-जिंतूर : ४१,४३७ (मृत ९,९४०, अनुपस्थित ४,१३९, स्थलांतरित २०,३५६, इतर १२०, दुबार ६,८८२).
९६-परभणी : ६२,९२७ (मृत ७,७७४, अनुपस्थित ३०,२२१, स्थलांतरित २०,१७५, इतर ४५३, दुबार ४,७०४).
९७-गंगाखेड : ३७,६९४ (मृत ९,४०७, अनुपस्थित ३,६२८, स्थलांतरित १८,५४२, इतर ५०, दुबार ६,०६७).
९८-पाथरी : ३८,१९१ (मृत १०,६८७, अनुपस्थित ४,५८६, स्थलांतरित १४,५५५, इतर ३३, दुबार ८,३३०).
मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत संबंधित मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेची नोंद व्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मतदारांनी आपल्याला प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रातील माहिती तपासून आवश्यक तपशील अचूक भरावेत आणि विहित मुदतीत संबंधित बीएलओकडे जमा करावेत.
मतदार यादीत कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये तसेच अपात्र नोंदींची नियमानुसार पडताळणी होऊन यादीतील त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
****


