मुंबई: ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी(दि ९) सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. काहीवेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.
lरतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटांच्या निधनानं देश शोकसागरात लोटला गेला आहे. टाटा रुग्णालयात गेले असल्याचं वृत्त सोमवारी आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतरही देशभरातून प्रार्थना सुरु झाल्या. टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं आहे. संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा आयुष्यभर साधेपणानं जगले. टाटा समूहानं कोणताही उद्योग सुरु करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केलं. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धारानं उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके झाले.
रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. १९९१ ते २०१२ या कालावधीत ते टाटा समूहाचे चेअरमन राहिले. टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. काळाची पावलं ओळखून त्यांनी टीसीएस कंपनी सुरु केली. टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. टाटांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी फायदेशीर ठरले. समूहाची घोडदौड सुरु ठेवताना टाटांनी कायमच उच्च कोटीची नैतिक मूल्यं जपली.
राज्यात एक दिवसाचा दुखावटा
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
रतन टाटांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री यांनी एक्सवर रतन टाटांसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्मिळ रत्न हरपले शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमधून रतन टाटांच्या कार्याचा गौरव देखील केला.