बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा
परभणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मटकर्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उध्दव गरुड, शहर चिटणीस वैभव संघई, मटकर्हाळा शाखा प्रमुख माऊली गरुड, प्रकाशराव गरुड, संतोषराव गरुड, प्रल्हाद गरुड, संतोष गरुड, सुरेश उत्तमराव गरुड आदींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.9) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आपल्या मागणी संदर्भातील निवेदन सादर केले.

त्यातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एप्रिल-मे 2024 ला तालुक्यातील मटकर्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. हे काम करतांना कंत्राटदाराने या रस्त्यावर फक्त खडी टाकली. खडी टाकून अर्धवट सोडून दिलेल्या कामामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. या दरम्यान अनेक अपघातही झाले आहेत. संबंधित कंत्राटदारास व सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकदा विनंती करुनही हे काम अजून सुरु करण्यात आलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून ते तात्काळ सुरु करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, मटकर्हाळा – आनंदवाडी या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डफली बजाओ आंदोलन व कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.


