पालम (प्रतिनिधी) राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दि. १६ डिसेंबर २०२४ पासून पालम तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्याकरीता मोहीम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज,उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा,विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे. शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे. शेतकऱ्यांना विविध
योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे तसेच प्रमाणिकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे. राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषि व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे. उच्च- गुणवत्तेचा डेटा व अँग्रि-टेकद्वारे कृषि उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
पालम तालुक्यातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक
(फार्मर आयडी) तयार करणेसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा.
तहसीलदार कैलास वाघमारे


