परभणी, (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्र, परभणी यांच्या वतीने सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आदरणीय ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी स्वतः महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पथकासह कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, अग्निसुरक्षा, आवश्यक सुविधा तसेच कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी महापौर सय्यद इकबाल यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या शिवरामनगर केंद्र संचालिका आदरणीय अर्चना बहिणजी, पाथरी केंद्राच्या आदरणीय शांता बहिणजी, माउंट आबू येथून आलेले विठ्ठलभाई, परभणी येथील वरिष्ठ राजयोगी तांदळेभाई, बरदाळेभाई तसेच माजी महापौर राजेंद्र वडकर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, श्रीकांत कुरा, अग्निशमन विभागाचे दीपक कानोडे, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड यांच्यासह स्वच्छता कर्मचारी अरुण पेडगावकर, नागनाथ कापसे, गणेशभाई, विक्रमभाई, काशिनाथभाई, सचिनभाई, स्वप्निल अर्थमवार आदींनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नियोजनासंदर्भात आवश्यक सूचना केल्या.
आदरणीय शिवानी दीदी यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने कार्यक्रमाची व्यवस्था चोख ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने विशेष नियोजन करण्यात येत आहे.


