परभणी, (प्रतिनिधी): इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि विमुक्त, भटक्या जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री यशस्वी योजनेंतर्गत ‘शाळांमधील टॉप क्लास शिक्षण’ ही योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 या वर्षासाठी राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
या योजनेचा उद्देश ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना निवडलेल्या टॉप क्लास शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळेचे शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क तसेच इतर संबंधित शुल्काकरिता आर्थिक मदत दिली जाते.
योजनेनुसार इयत्ता 9 वी व 10 वीतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी कमाल 75 हजार रुपये, तर इयत्ता 11 वी व 12 वीतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी कमाल 1 लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शाळेकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क व इतर शुल्कांसाठी देय असेल.
ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. राज्यासाठी उपलब्ध शिष्यवृत्तीचे स्लॉट ओबीसी लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येतात. शिष्यवृत्तीचे वितरण गुणवत्तेनुसार (गुणानुक्रम) करण्यात येणार असून, प्रत्येक वर्गासाठी राज्यनिहाय मुला-मुलींची स्वतंत्र गुणानुक्रम यादी तयार केली जाईल. उपलब्ध स्लॉटनुसार शिष्यवृत्तीचे वाटप स्वयंचलित पद्धतीने करण्यात येणार आहे.
या योजनेत किमान 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असून, शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्यात येईल. शिष्यवृत्तीची रक्कम दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी एकाच हप्त्यात वितरित करण्याची तरतूद आहे. योजनेत निवडलेल्या शाळांमध्ये आधार आधारित उपस्थिती प्रणाली असणे आवश्यक आहे. तसेच या प्रणालीची आवश्यकता भासल्यास केंद्रीय पोर्टलशी जोडणी करता येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेत समाविष्ट बाबींसाठी अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. यापूर्वी टॉप क्लास शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्गातील अंतिम परीक्षेतील गुणांच्या आधारे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करता येईल.
या योजनेतील टॉप क्लास शाळांची निवड, दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये 100 टक्के निकाल कायम राखलेल्या शाळांच्या निकषानुसार, संयुक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभाग व नीती आयोगाच्या प्रतिनिधींच्या समितीद्वारे करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळांनी इयत्ता 9 वी ते 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, परभणी रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
*-*-*-*-*-


