परभणी (प्रतिनिधी) भारत हा युवकांचा देश आहे इथल्या युवक युवतीने आपले ध्येय शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करावेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे कणखर माध्यम शिक्षण हेच आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व भडक मार्गाच्या नादी न लागता शाश्वत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे. इतर चंगळ मार्गाकडे न वळता सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कलागुणांना अधिकाधिक गतिमान करावेत. तेव्हाच सर्वांगीण विकास होईल. आजच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल युगाकडे अधिक प्रमाणात वेळ खर्च करू नये. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यापेक्षा समाज गाव आणि राष्ट्रहितासाठी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकसित करावे असे प्रतिपादन कविता नावंदे निंबाळकर(जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी) यांनी केले
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे ब्राह्मणगाव येथे 07 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय विशेष युवक शिबिर संपन्न झाले. या समारोप सांगता समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले होते. तर विचार मंचावर डॉ. तुकाराम फिसफिसे डॉ. रविराज वाळवंटे, डॉ. हरिभाऊ गायकवाड ,बाबुराव गाडगे श्री टी एच साके आदी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दगडू अण्णा काळदाते(सरपंच) मधुकर काळदाते, दिगंबर नाईक, माणिक गाडगे, श्री पोले मुख्याध्यापक आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सय्यद अखेद, कृष्णा गाडगे गुरवे पूजा, श्रद्धा खानपट्टे आदी विद्यार्थ्यांनी शिबिर अनुभव व्यक्त केले. तसेच बाबाराव गाडगे, श्री टी एच साके, डॉ.रविराज वाळवंटे,प्रा.डॉ.तुकाराम फिसफिसे आदिंनी समायोजित विचार मांडले. पुढे बोलताना कविता नावंदे म्हणाले की, देशात अस्थिर वातावरण तयार झालेले आहे. त्याचे कारण फक्त असंस्कारशील शिक्षण आहे. आदर्श मूल्य व नीतिमताचे धडे फक्त महाविद्यालयाच्या विविध उपक्रमशील शिक्षणातून मिळते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमात पूर्णपणे झोकून दिल्यास भविष्यात आदर्श नागरिक तयार होतात . सध्या देशाला आदर्श व मूल्य संस्कार युक्त अशा विद्यार्थ्यांची नितांत गरज आहे. असेच विद्यार्थी देशाची सुसंपन्न जडणघडण करू शकतात. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. घुले म्हणाले की विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना आहे. त्यातूनच त्यांच्या जीवनाला आकार आणि उकार प्राप्त होतो. ती ऊर्जा प्राप्त करण्याचे सशक्त माध्यम राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर आहे .अबोल असणारे विद्यार्थी सुद्धा शिबिराच्या माध्यमातून उद्याचे चालते बोलते आणि सक्षम नेतृत्व करणारे आदर्श व गुणवान नागरिक म्हणून नावलौकिक प्राप्त करू शकतात.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कल्याण गोपनर यांनी केले. तर सूत्रसंचालन कु. श्रद्धा खनपटे हिने केले. तर आभार कु. पूजा गुरवे हिने मानले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. योगेश कुऱ्हाडे ,श्री भगवान गाडगे, डॉ. मोतीराम कदम ,डॉ. गायके, प्राध्यापक गंगाधर भालेराव डॉ. चिंचोलकर डॉ. हनुमंते, प्रा. आनंद कांबळे डॉ. राहुल कापुरे आदींनी अथक प्रयत्न केले .तर या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका, तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


