“शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट बंद करा; कोचिंग माफियांवर कारवाई करा : सुहास पंडित “*
परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश, स्टेशनरी व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच राज्यभरात खाजगी कोचिंग क्लासेसचे वाढते व्यापारीकरण, अवाजवी शुल्क आकारणी आणि विद्यार्थी-पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती रोखण्यासाठी तसेच राज्यात स्वतंत्र खाजगी कोचिंग क्लासेस विनियमन कायदा लागू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, काही शाळांकडून विशिष्ट दुकानांमधून साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असून त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण रोखण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
तसेच राज्यातील अनेक खाजगी कोचिंग क्लासेसकडून अवाढव्य शुल्क आकारले जात असून प्रवेशानंतर फी परत न करण्याच्या अटी, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि निकालांचे अतिरंजित सादरीकरण यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या व्यावसायिक शिकवण्यांमुळे शाळांमधील उपस्थिती कमी होत असून नियमित शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.
काँग्रेसच्या वतीने शाळांच्या साहित्य विक्रीची चौकशी, सक्ती करणाऱ्या संस्थांवर कारवाई, कोचिंग क्लासेसची अनिवार्य नोंदणी, शुल्क नियंत्रण यंत्रणा, विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र प्राधिकरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत जागा कोचिंग क्लासेस मध्ये तरतूद तसेच राज्यातील प्रमुख कोचिंग संस्थांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुहास पंडित, सत्तार इनामदार, आमिर खान पठाण (अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष), ज्ञानेश्वर वाघमारे (ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष), प्रसाद डुकरे, संजय पारडे, युनूस भाई, रौफ अत्तार , नितीन रनेर, नविद आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


