परभणी, ( प्रतिनिधी) – चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील समाधान आणि स्वागतासाठी सजलेली शाळा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात मानवत येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेशोत्सवाने करण्यात आली.

आज शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती वैशाली पंकजराव आंबेगावकर, मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राणी अंकुश लाड, नगरसेवक मोहनराव लाड, मुख्याधिकारी कोमल सावरे, पंचायत समितीचे उपसभापती सुरजभैय्या काकडे, सदस्य श्री. शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणीताई गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, सदस्य श्रीराम पकवाने, रामभाऊ गोलाईत, गायकवाड यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे स्वागत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांनी प्रस्ताविकातून शाळेची गुणवत्ता पालक व समाजाच्या सहकार्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांच्या माध्यमातून वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मुलींचे शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले तर शेवटी सोनय्या कीर्तनकार यांनी आभार मानले.
***


