परभणीत 23व्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचा समारोप
परभणी,(प्रतिनिधी) : समाजातील अंध रुढी, अंधविश्वास घालून विचारांच्या पातळीवर समृध्द समाजनिर्मितीसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखनी झिजवली. अण्णाभाऊंच्या कृतीशिल कार्याला समर्पित असणार्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ते विचार कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय इतकी वर्ष सातत्यपूर्ण वाटचाल करीत संमेलनाच्या माध्यमातून पुढे नेले. हे संमेलनसुध्दा समाजाला नवे डोळे, नवा दृृष्टीकोन व सामर्थ्य देणारे ठरले आहे, असे मत 23व्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
लाल सेनेच्या वतीने येथील बी. रघुनाथ सभागृहात आयोजित 23व्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अन्य मान्यवर व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. अनिल कांबळे यांच्याहस्ते सकाळी झाले. यावेळी महापौर सय्यद इकबाल, नगरसेवक डॉ. केदार खटींग, डॉ. परमेश्वर साळवे, अमोल रणखांब, संतोष तुपसौंदर, जिजाभाऊ थोरात, विकास राजापुरे, परमेश्वर बंडेवार व दत्ता तांबे हे व्यासपीठावर विराजमान होते. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व मान्यवरांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले व अण्णाभाऊंच्या विचारांची महती विशद केली.
या संमेलनाच्या दुसर्या सत्रात शाहीर रमेश गिरी आणि संचाने शाहीरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंना वंदन केले व समाजातील अंधरुढी, अंधविश्वासातून बाहेर पडून अण्णाभाऊंचा परिवर्तनवादी विचार आत्मसात करावा, असे आवाहन केले.
संमेलनात तीसरे सत्र परिसंवादाचे होते. ‘परिवर्तनाच्या चळवळीत मातंग समाजाचे योगदान व पुढील आव्हाने’ या विषयावर आयोजित पहिल्या परिसंवादात डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे हे अध्यक्षस्थानी होते. फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीत मातंग समाजाचे मोठे योगदान आहे. परिवर्तनाच्या चळवळीत मातंग समाजाला घेऊन येण्यासाठी मातंग समाजाने अण्णाभाऊंच्या रुपाने बांधलेला पुल उध्दवस्त करण्याचे काम काही समुहाकडून होत असल्याची खंत व्यक्त केली. आरक्षण उपवर्गीकरण हेच पुढील काळातील मातंग समाजासमोरील आव्हान असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मातंग मुक्ती सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष अशोक साबळे, छत्रपती संभाजी नगर येथील आरपीआयचे नेते संजय ठोकळ, माजलगांव येथील विद्रोही लहुजी सेनेचे अध्यक्ष भास्कर शिंदे तर माजलगांव येथील आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या सत्रातील दुसर्या परिसंवादात ‘महाराष्ट्रातील उपवर्गीकरण प्रक्रियेसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली येथील डॉ.बी.एस. वाघमारे हे अध्यक्षस्थानी होते. समतावादी समाज निर्माण करण्याकरीता आरक्षण उपवर्गीकरण असून उपवर्गीकरणाला जर कोणी जातीवाद म्हणत असेल तर ते चूक असून उपवर्गीकरण हेच समाजाला न्यायाकडे व समानतेकडे घेऊन जाणारे आहे, असे ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण विषयाचे गाढे अभ्यासक केशव शेकापुरकर (नांदेड) यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात सरकारने वर्गीकरणाचा निर्णय घेतला. तर अन्य काही राज्यांनी एका वर्षात त्या संबंधीचा निर्णय घेऊन ते मोकळे झाले. परंतु, महाराष्ट्र सरकार दोन वर्ष होवूनसुध्दा ते निर्णय घेत नाही. उपद्रव मुल्य मान्य करणारे हे आपले सरकार असल्यामुळेच उपद्रव वाढविणे गरजेचे असतांना मातंग चळवळ मात्र क्षीण झाली आहे, अशी खंत या मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी अशोक उफाडे यांनीही आपले विचार मांडले.
तीसर्या परिसंवादात ‘अण्णाभाऊंचे जग बदलाचे तंत्रज्ञान’ या विषयावर आदर्श महाविद्यालय हिंगोली येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ. दयाराम मस्के हे अध्यक्षस्थानी होते. अण्णाभाऊंचे साहित्य जागतिक दर्जाच्या साहित्यिक विचारवंतांशी साधर्म्य असणारे ताकदिचे साहित्य आहे. परंतु, त्यांच्या साहित्याची सातत्याने उपेक्षा करण्याचे प्रयत्न सुरु असला तरीही मराठी वाचकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याला डोक्यात घेऊन मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले. या परिसंवादात अॅड. संदीप दात्रे, राजे उफाडे यांनी मत व्यक्त केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेकरीता लालसेनेचे ज्ञानेश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष एल.डी. कदम, अविनाश मोरे, उत्तम गोरे, भुजंग कांबळे, अशोक उबाळे, हेमंत साळवे, प्रा. सचिन दाढेल, प्रा. दत्तात्रय हळदे, किशोर कांबळे, दिलीप कांबळे, अण्णाभाऊ उबाळे, श्रीरंग रणखांब, रमेश गायकवाड, के.के. भारसाखळे, अजित शिंदे, प्रकाश गायकवाड, भागवत जलाले, सिध्दांत भिसे, अमन कदम, संविधान भिसे, तथागत झोडपे, सारजाबाई भालेराव, दिपक गवारे, ईश्वर साबळे, सुरेश राऊत, व्यंकट कांबळे, संदीप कदम, आश्रोबा उफाडे, गिरजाबाई कांबळे, शिवा नेटके, अभिषेक मोटे, विशाल वाव्हळवे, लखन पवार आदींनी परिश्रम घेतले. शाहीर गंगाधर पौळ, अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन तर लाल सेनेचे प्रमुख कॉ. गणपत भिसे यांनी प्रास्ताविक केले. या संमेलनास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.


